दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही हवामान तज्ञ माणिकराव खुळे

दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही हवामान तज्ञ माणिकराव खुळे

दाना चक्रीवादळ ; थायलंडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 23/ऑक्टोंबर पर्यंत तीव्रता वाढून याचे चक्रीवादळ निर्माण होईल, असे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकणार असल्याने महाराष्ट्राला कोणताही धोका नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरातील उत्तर अंदमान समुद्रात दि. 21 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने 23/ऑक्टोंबर पर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत.

ही वादळी प्रणाली 24/ऑक्टोंबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दरम्यान, पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली भारताच्या किनारपट्टीपासून दूर जात आहे.

बंगालच्या उपसागरात थायलंडच्या पश्चिमेला कमी दाबाची प्रणाली तयार होईल, असे हवामान खात्याचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यानंतर ते वायव्येकडे सरकून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येईल. चक्रीवादळ जमीनीवर आल्यावर बांगलादेशकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याने महाराष्ट्राला धोका नाही.

राज्यात सध्याचा पाऊस दोन दिवस सुरू राहणार असून, बुधवारपासून 23/ऑक्टोंबर पर्यंत ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल. त्यानंतर 01 नोव्हेंबरपर्यंत जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, उत्तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशीम, अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाची उघडीप राहील.

 

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण भारतात पाऊस पडतो. या ईशान्येकडील, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल. या पावसामुळे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment